संजय आवटे
पौगंडावस्थेतली पोरं अचानक माना टाकू लागली आणि आत्महत्येच्या दिशेने तरुणाई निघाली. एखादा संसर्गजन्य आजार आहे, अशी वर्णनं आत्महत्येबाबत होऊ लागली. मी कमालीचा बेचैन झालो. या सगळ्याच्या मुळाशी जावं या निर्णयाप्रत आलो.
ज्या वयात फुलावं- उमलावं त्या काळात कोवळ्या कळ्यांनी कोमेजून का जावं, हा प्रश्न छळू लागला. ज्याचं उत्तर आपल्याकडे नाही, ते असल्याचा आव आणण्याचा अप्रामाणिकपणा कधी करू नये. त्यापेक्षा प्रश्नाचा आवाका पहावा. प्रमेयाची व्याप्ती पहावी.
या कोवळ्या पोरांना हवा भरणं फार कठीण नाही, त्यांच्या आई-बापांना बोल लावण्याएवढं सोपं तर काहीच नाही; पण अशानं काही उत्तर गवसत नाही. ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.
योगायोगानं त्याच वेळी 'कलात्म' ची कल्पना पुढे आली. सामाजिक संदर्भांत कलेच्या आकलनाचा प्रयत्न अभावानेच होताना दिसतो. कलावंत वा समीक्षकांच्या नव्हे, तर समाजाच्या दृष्टीने 'कला' या विषयाकडे पहायला हवे, असे वाटल्याने 'कलात्म' या विशेषांकाची आवश्यकता अधोरेखित झाली. या संदर्भात विचार करताना कधीतरी लक्षात आलं की, जगण्याच्या कक्षा विस्तारत असताना आपण आनंदाच्या शक्यता मात्र कमी-कमी करत चाललो आहोत. घटनांची गुंतागुंत वाढू लागली असताना आपण अन्वयाच्या शक्यता किमान करत चाललो आहोत.
अशी एक व्यवस्थाच आपण स्वत:भोवती गुंफून घेतली आहे. आपल्या सोयीसाठी आणि रक्षणासाठी म्हणून या रेषा मारल्या गेल्या खर्या; पण त्या रेषांचेच आता आपण गुलाम झालो आहोत. त्यामुळे सगळे पर्याय खोडत-खोडत अशा जागी येऊन स्थिरावलो आहोत, की 'जगावं की मरावं' असा सवाल उपस्थित व्हावा. एकीकडे आपली परीक्षापध्दती बहुपर्यायी होत असताना जगण्याच्या या परीक्षेत मात्र आपल्याकडे पुरेसे पर्याय नाहीत. या एकारलेल्या जगण्याला 'फोकस्ड' असंही म्हणण्याची पध्दत असली तरी एकारलेपणातून नाकारलेपण येतं, हे अजून आपल्याला नीटसं उमगलेलं नाही. जिथं आपण आपलं आयुष्यच जगत नाही तिथं आयुष्याविषयी काय नि कसं बोलणार? आनंदाची एकेक शक्यता हद्दपार करीत प्रवासाला निघाल्यावर ती आनंदयात्रा होण्याची भाषा कशी आणि कोणत्या शब्दात बोलणार? आनंद नावाच्या ज्या गोष्टीसाठी सारे अट्टहास करतो आपण, ते अट्टहास यथास्थित पूर्ण होतात. सारे सुरळीतपणे सुरु असते. फक्त या धबडग्यात लक्षात येते की , बाकी तसं छान चाललंय ; पण ज्यासाठी आहे हा अट्टहास तो आनंदच आपल्याला सोडून गेलाय.
'शॅडो फ्रॉम लडाख' नावाची एक उत्तम कादंबरी आहे, डॉ. भवानी भट्टाचार्यांची. 'साहित्य अकादमी' पारितोषिकविजेती कादंबरी. टागोर आणि गांधींच्या वाटेने खेडयापाडयातील भारताला धुंडाळणार्या भट्टाचार्यांनी विलक्षण नाट्य फुलवले आहे या कादंबरीत. या कादंबरीतील गोष्ट आठवली अचानक. एका राजबिंड्या तरूणाला ऐन तारुण्यात नैराश्य येते. ( मुळात नैराश्य ही प्रामुख्याने तारुण्यात भेटणारीच गोष्ट! ती तशी वाईटही नाही. असलीच तर सृजनशील आहे. नाहक उत्साहाने रटरटणारे सो कॉल्ड 'सक्सेस फ्रेंडली' स्मार्ट चॅम्प्स पाहिल्यावर तर हे अगदी पटते. मुद्दा असतो त्या नैराश्याला भिडण्याचा. पण तो सोडा!) तर, हा निराश राजपुत्र असतो प्रेमाच्या शोधात. खरे प्रेम काही गवसत नाही. जे मिळते, ते राजघराण्याचा वारसा असल्यामुळे किंवा देखणे रूप असल्यामुळे. तो कातावतो. दुखावतो. कमालीचा अस्वस्थ होतो. आयुष्यावर रागावून तो सगळे सोडतो. अंगच्या साध्या कपड्यानिशी येतो जंगलात आणि बसतो थेट तपश्चर्येला. काही झाले तरी तपश्चर्याभंग होऊ द्यायचा नाही.
मोठ्या निग्रहाने बसतो. डोळे मिटून घेतो. जंगलातील आल्हाददायक हवा त्याला खुणावत नाही की वाघसिंहाच्या डरकाळ्यांनी त्याची गाळण उडत नाही. तो तपश्चर्येला बसतो. दिवसांमागून दिवस जातात. त्या जंगलात काटक्या वेचण्यासाठी एक गरिबाघरची एक पोर येत असते. ती याला पाहते. याच्यासाठी दररोज पाणी आणते. कंदमुळे आणते. आजूबाजूची जागा कायम साफसूफ ठेवते. अगदी प्रेमाने करत असते सगळे. 'संवाद' शून्य. पण असे सगळे सुरू असते. दिवसामागून दिवस जातात. वर्षांमागून वर्षे. सगळे तसेच सुरू असते. राजपुत्र तपश्चर्येत मग्न असतो; पण त्याच्या मनाच्या एका कोपर्यात आता त्या मुलीने जागा केलेली असते. अर्थात, अशा कोणत्याही अडथळ्यांनी व्यत्यय यावा, असा तो लेचापेचा नसतो. त्यामुळे त्याची तपश्चर्या सुरु असते. नंतर काहीतरी होते आणि मुलीच्या बापाची नोकरी बदलल्यामुळे किंवा आणखी कशाने, ते कुटुंब आपले बिर्हाड हलवते. त्यामुळे ती मुलगी अदृश्य होते. योगायोग असा की, त्यानंतर लगेच याच्या तपश्चर्येला यश मिळते. प्रसन्न झालेला देव त्याला विचारतो, '' वत्सा, तुला काय हवे ते माग.'' गोंधळलेला तरूण नकळत उत्कटपणे म्हणतो,'' देवा, मला काही नको आणखी; पण एकच दे. ती इथे येणारी मुलगी मला हवी. असे प्रेम कोणाच्या डोळ्यात मी यापूर्वी पाहिले नाही!''
आनंद आणि यशाची खरी गंमत अशी असते. ही गोष्ट मी वाचली, त्याला बरेच दिवस उलटले. व्यंकटेश माडगूळकरांनी या कादंबरीचा केलेला अनुवाद वाचला, त्यालाही बरेच दिवस होऊन गेले.त्यामुळे तपशिलांविषयी मला खात्री नाही. तपशिलांपेक्षा तपश्चर्या महत्वाची, आशय महत्वाचा. मला वाटतं, मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.
काहीतरी ग्रेट मिळवण्याच्या नादात आजूबाजूचे आनंदाचे क्षण हरवणे, हे आपले रोजचे जगणे झाले आहे. मी इथे मोहाच्या तत्कालिक क्षणांविषयी बोलत नाही. आपले जगणे समृध्द करणारे आनंदाचे कैक क्षण येतात आपल्या मुठीत आणि आपण ते गमावून बसतो. कारण आपल्या लेखी आनंद नावाचा काहीतरी मुक्काम असतो. ती यात्रा नसते. अशी फसगत सुरू होते, ती अगदी आपल्या जन्मापासूनच. नंतर अशा फसवणुकींची इतकी सवय होते की, आपणही सराईतपणे ती खरी मानू लागतो. त्या खोट्या जगण्याला आपले खरे जगणे मानू लागतो. आणि मग या फुटपट्टीने अवघ्या जगाचे जगणे जोखू लागतो. व्यक्तिगत जीवनापासून सामुहिक जगण्यापर्यंत अशा फूटपट्ट्या तयार होत जातात. त्या जगण्याला चिकटतात. अशा पट्ट्या फेकून देण्याचे धाडस कधी होत नाही, कारण त्या फेकल्या की आपले पोकळपण प्रकर्षाने जाणवू लागते.
या फसवणुकीची सुरुवात होते अगदी जन्मल्यापासून. म्हणजे पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, ('पुलं'ना 'योग्य' कारणासाठी कोट करण्याची आपल्याला अजिबात सवय नाही. त्यामुळं हे जरा अनपेक्षित वाटेल) प्रत्येक बाबतीतलं 'कुतूहल' हे बालपणाचं लक्षण; आणि अवघं बालपण ज्या शाळेत घालवायचं, त्या शाळा नावाच्या इमारतीत मुख्य काम चालतं ते, हे कुतूहल नाहीसं करण्याचं. मूल जन्माला आल्यापासून त्याच्या इच्छेविरुद्ध जसं त्याला नाड्या आवळून-आवळून आणि बटणं लावून-लावून कपड्यांच्या बंधनात कोंबण्यात येतं; तसंच मानसिक आणि बौध्दिक वाढीच्या नाड्याही आवळल्या जात असतात.
आनंदाच्या शक्यता आक्रसून टाकण्यावरच आपली अवघी अवस्था उभी आहे. 'तुम्हाला जे मनापासून वाटतं, ते न करणं म्हणजे सभ्यता', अशी साधी व्याख्या आहे. आनंदासाठीची नैसर्गिक साधनं संपली की, माणसं आनंदाच्या अनैसर्गिक साधनांकडे वळतात, हे कोणत्याही उदाहरणांवरून आपल्याला पटायला हरकत नाही. पण तरी ज्यामध्ये सहजपणे नैसर्गिक आनंद मिळतो, असे काहीही आपल्याला नको असते. आनंदी झाली की, माणसं नाचतात, गुणगुणतात, उड्या मारतात. देश कोणताही असो आणि भाषा कुठलीही असो; सर्वत्र हे असेच घडते. पण तरीही शाळा नावाच्या इमारतीत नाच नाही, गाणं नाही!
व्यवस्था अशी आहे की, जे सिरियसली या नाचगाण्याच्या फंदात पडतात, तेही नंतर तिकडं त्या क्षेत्रात अशा पद्धतीनं जगायला लागतात की वाटावं, नाच-गाण्यानं यांचं असं होणार असेल, तर त्यापेक्षा कॉर्पोरेट जगतातल्या मारामार्या काय वाईट? कारण आपण आनंदासाठी इकडं वळलोय, हे तेही हळूहळू विसरून जातात. त्यात नाव कमवायचं म्हणजे 'रॅट-रेस' अटळ आणि ती एवढी वाढते पुढे की, अवघी साधना संपल्यावर किंवा एखाद्या वळणावर या 'उंदरांना' जाणवते, अरे सारे मिळाले; पण आपल्याला जे हवे होते यातून, ते तर कधीचेच निसटले हातातून.
एक तर गंमत अशी आहे, लोकांच्या लेखी कला नावाचं काहीतरी वेगळं जग आहे. म्हणजे हे समांतर जग आहे आणि हे ग्रेट वगैरे पण आहे. मात्र, या जगाचा आपल्याशी काही संबंध नाही. शिवाय त्या जगाशी आपला संबंध न आल्यामुळे आपलं काही अडत नाही. आणि समजा आला संबंध, तरी त्यातून काही आपण घडत नाही! त्यामुळे या कला वगैरे प्रकाराच्या नादी कोणी लागत नाही. एखाद्या गाण्याच्या मैफलीला जाऊन बसल्यामुळे प्रतिष्ठा वगैरे मिळत असेल, तर जायला हरकत नाही; पण न गेल्यामुळे काही बिघडत नाही, अशीच धारणा दिसते. त्यातून मग आयकॉन्स उदयाला येतात. कारण मूळ कलाप्रकारात काही रस नसतो. तो कळण्याची शक्यता नसते. गरज वाटत नसते; पण जुजबी माहिती असावी, अशी इच्छा असते. मग 'बिरजूमहाराज म्हणजे कथ्थक' अशा काही प्रतिमा तयार झाल्या की प्रश्न सुटतो. त्यातून कलेच्या क्षेत्रात 'आयकॉन्स' तयार होतात; पण कला आणि समाज यातील द्वैत उत्तरोत्तर वाढत जाते. कलावंतांना तर ते अनेकदा हवे असतेच. कारण त्याशिवाय त्यांच्यातील व्यवच्छेदक वेगळेपण कसे जाणवणार? त्यामुळे 'मास'साठी आपण नाही, हे सिद्ध करण्यातच अभिजात कलांच्या अनेक साधकांचे आयुष्य खर्ची पडते. माणूस जन्मल्यावर ज्या सहजपणे आणि अलगदपणे भाषा शिकतो; त्यच अलगदपणे त्याला नृत्य भेटते, साहित्य सापडते, संगीत ऐकू येते, चित्र दिसते. प्रत्येक मूल भाषा शिकते म्हणजे ते भाषाप्रभूच होईल असे नाही. भाषेत ते करिअर करील, असे नाही. पण भाषा त्याचे आयुष्य घडवते. तसेच अगदी, गायन-संगीत-नृत्य-चित्रात कोणी फार मोठा तीर मारेल, असे नाही; मात्र हे सगळे त्याच्यापाशी असते. त्याच्या आवाक्यात असते. हळूहळू हे सारे त्याच्या पोतडीतून काढून टाकले जाते. मग चक्क दोन थेट वर्ग पडतात. एक - 'कला' प्रांतात हुंदडणार्यांचा आणि दुसरा - कलेशी देणे-घेणे नसणार्यांचा. त्यातील पहिला वर्ग अर्थातच मूठभरांचा.
साक्षर झालेला प्रत्येक जण मोठा साहित्यिक होईल, अशी अपेक्षा नसते किंवा साक्षर असणारा प्रत्येक जण आरती प्रभू, ग्रेस, दि. पु. चित्रे, भालचंद्र नेमाडे वाचत सुटेल, अशीही अपेक्षा नसते. पण किमान तो वाचू शकतो. (अगदी तांत्रिक अंगाने तरी आशयाच्या अंगाने इथेही गोंधळ आहेच.) बाकीच्या कलांच्या बाबतीत तर आनंदीआनंद. म्हणजे नृत्य पाहूही शकत नाही आणि गाणे ऐकू शकत नाही. कारण हे प्रकार त्याला शाळेत कधी आडवे यत नाहीत. चुकूनमाकून कुठे आवड विकसित झालीच, तर त्याला अपघात म्हणावे लागेल. मात्र, तसे अपघात शाळेच्या 'निर्धोक' प्रांगणात घडण्याची शक्यता कमी. कारण आपण सारे अक्षरप्रामाण्यवादी. त्यामुळे पुस्तके सर्व काही सांगतील, अशी श्रद्धा. चित्रकलेविषयी मुलांना माहिती हवी, असे वाटले तर एखाद्या चित्रकाराचा धडा; अजिंठा-वेरूळ लेण्यांवर एखादा पाठ. बास! बरं, एवढं करून ज्या अक्षरप्रामाण्यवादावर आपली व्यवस्था उभी आहे, त्या अक्षरांचे तरी काय? म्हणजे लहाणपणापासून ज्या कवी-लेखकांचे बोट धरून आपण सगळे शालेय शिक्षण संपवतो, ते कवी-लेखक पुन्हा हाती घ्यावेत, असे तरी किती जणांना वाटते? उलटपक्षी, 'कवी इथे काय म्हणतो?' आणि 'लेखकाला इथे काय म्हणायचे आहे?' असल्या प्रश्नांच्या जचातून सुटका झाल्याचाच काय तो आनंद!
आणि म्हणे, जगण्याच्या कक्षा साहित्य रुंद करते; कला तुमच्या अस्तित्वाच्या कक्षा वाढवते! रुंद करते म्हणजे, कोणाच्या कक्षा रुंद करते? त्यांच्या कक्षेतच कला नसेल, तर अशी कला असली काय आणि नसली काय! एखाद्या नव्या संशोधनामुळे हृदयावर सहजपणे शस्त्रक्रिया होऊ शकते, हे भलेही खरे असेल; पण ती शस्त्रक्रिया नव्वद टक्के लोकांच्या आवाक्यातच नसेल, तर त्या संशोधनाची उपयुक्ततता ती किती? शिवाय, ज्या लोकांच्या आवाक्यात कला आहे, त्यापैकी निम्मे त्यावर अवलंबून आहेत. म्हणजे कलावंत म्हणून, समीक्षक म्हणून, संयोजक म्हणून किंवा आणखी वेगवेगळ्या जोड उद्योगांच्या निमित्ताने. उरलेले जे आहेत, त्यांना किशोरीबाईंच्या गाण्यातून आनंद घेण्यापेक्षा त्या गाण्यावर चर्चा करण्यात आणि त्यातून आपले पांडित्य सांगण्यातच अधिक रस. त्यांना कलेचे वेगळे आयाम कळावेत ते कसे? ज्याला दि. पु. चित्रे फडताळात ठेवण्यात अधिक स्वारस्य, त्याला 'बुडते हे जन, न देखवी डोळा'चा तुकोबाचा कळवळा दिपुंच्या मांडणीतून तरी कसा कळणार! 'वळू' बघून लंब्याचौड्या गप्पा मारणार्या माणसाला खेड्यापाड्यांतील जगण्याची चव कळत नसेल तर काय उपयोग होणार किंवा वेश्येचे जगणे समजून घेणार्या 'आर्ट फिल्म'वाल्या माणसाला घरातील त्याच्या वयोवृद्ध मावशीच्या जगण्याला असणार्या कंगोर्यांविषयी सहानुभूती नसेल, तर आर्ट फिल्म त्याला काय देणार? मग काही मूठभरांचे 'इगो' कुरवाळणे; मर्यादित अर्थाने का असेना, पण अर्थकारणाला गती मिळणे आणि काही जणांना करिअर ऑप्शन देणे, एवढेच कलेचे प्रयोजन आहे का? तसे असेल तर हरकत नाही. पण मग आपण सगळ्यांनी सामूहिक स्तरावर त्याचा एवढा उदो-उदो करायचे कारण काय? चित्रपट-नाटक हे 'पॉप्युलर कल्चर'शी संबंधित प्रकार वगळले, तर संगीत-नृत्य-चित्रकला-शिल्पकला या कलांच्या अभिजाततेची चिंता उगाच सर्वांनी करण्याचे काय कारण? त्यापेक्षा 'आयपील' सारखे अधिक रजक खेळ आपल्याकडे आहेत ना मग!
डॉक्टरांची हॉस्पिटल्स बरी चालावीत, या अंगाने आरोग्याचं भलं व्हावं, असं नाही ना म्हणात आपण; मग कलेचं काय? कलेविषयी का बोलतो आहोत आपण?
कारण कला खरोखरच रुंद करते तुमच्या जगण्याच्या कक्षा. कला वाढवते आनंदाच्या शक्यता. कला सूचित करते वाटा अन्वयाच्या. आजवर कधी नव्हे एवढी कला महत्त्वाची ठरू शकणार आहे नव्या काळात. अवघे जग बदलत आहे. झपाट्याने बदलत आहे. हा झपाटा केवळ 'इन्फर्मेशन'ने समजणार नाही. उलटपक्षी त्यामुळे गोंधळ वाढण्याची भीती आहे. या झपाट्याला अनुकूल अशी ज्ञान, विज्ञान आणि कला यांची बैठक आपण निर्माण करू शकलो नाही, तर सगळेच कोसळेल. आज तरी या घडीला तशी बैठक आपल्याकडे नाही. ज्ञानाच्या नावाने आपण माहितीविषयी बोलतो. विज्ञानाच्या नावाने तंत्रज्ञानाविषयी बोलतो आणि कलेच्या नावाने कलवंतांविषयी, कलेच्या शास्त्राविषयी किंवा त्यापेक्षा वाईट म्हणजे त्या क्षेत्रातील सेलिब्रिटी, स्टारडम आणि गॉसिपिंगविषयी बोलतो. मग कलेचा खरा उपयोग कसा व्हावा? कलेचे खरे प्रयोजन तरी कसे समजावे? अशा समाजात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळाच घोटला गेला किंवा अस्मितांच्या पायदळी कला-साहित्य तुडवले गेले, तर त्यात अस्वाभाविक असे काय?

(कलात्म प्रकल्पाच्या संपादकीय पुस्तकातील, 'कला कल्पतरूंचे आरव'मधील एक उतारा)
No comments:
Post a Comment