Thursday, 24 February 2011

जगण्यासोबत कलाही बदलते ...


डॉ. श्रीराम लागू

संस्कृती, शिक्षण आणि कलेचा संबंध अतूट आहे. कला जोपासण्यासाठी आर्थिक समृद्धी गरजेची, पण ती आर्थिक समृद्धी कशी मिळवावी, याचे शि़क्षण आपल्याला संस्कृतीमधून मिळत असते.
कलाकारांनी सामाजिक बांधीलकी जपावी, पण कलाकाराची बांधीलकी प्रथम कलेशी असावी. कलेशी अतूट बांधीलकी असेल, तर समाजाशी आपोआपच बांधीलकी निर्माण होईल. कलाकार समाजाला समृद्ध करण्याचे काम करत असतात. जागतिकीकरणाच्या काळात सर्व संदर्भ बदलत असताना तर कलेच्या समोर अनेक नवी आव्हाने आहेत; पण कलांना मरण मात्र नक्कीच नाही. भारतीय चित्रपटांची तुलना जागतिक चित्रपटांशी होऊ शकेल; मात्र भारतीय संगीताची तुलना जगातील कोणत्याही संगीताबरोबर करता येणार नाही. दुसरीकडे, ज्या लोककला आहेत त्या लोककला म्हणून जिवंत राहतील का याविषयी शंका वाटणे स्वाभाविक आहे. कारण लोककलेचा पाया आर्थिक आहे. खेड्यातील लोकांना आर्थिकदृष्ट्या तमाशा, लावण्या पाहणे शक्य आहे. मात्र, त्यांना महागडे चित्रपट, नाटकं, गाण्याच्या मैफिली पाहणे शक्य नाही. त्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. शिवाय भारतीय संस्कृती कप्पेबंद आहे. उच्च वर्णाची, खेड्यांची संस्कृती वेगळी आहे. भारतीय संस्कृतीत एकसारखेपणा नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या प्रथा, परंपरा यांना चिकटून न राहता आपल्याला नवे शिकावे लागेल. जगाच्या बरोबर बदलावेच लागेल. त्यातून कला खर्‍या अर्थाने समृद्ध होईल. भारतीय कलांपुढे भौतिक आव्हाने आहेत. समाजाची सर्वांगीण प्रगती कलांना पोषक ठरणारी आहे. बुद्धिमान, वैभवशाली समाजच कलांची योग्य जोपासना करू शकतो. जो समाज सुसंस्कृत आहे, त्या समाजात अनेक कलांचा संगम झालेला आढळतो.
आपला समाज सर्व जातीधर्मांचा आहे. या समाजाच्या गरजा, मागण्या वेगळ्या आहेत. त्यांची संस्कृती, मनोरंजनाची साधनेही वेगळी आहेत. महाराष्ट्र सरकार जे सांस्कृतिक धोरण ठरवते, त्यात या वस्तुस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे. त्याशिवाय असे धोरण यशस्वी होऊ शकत नाही.
सध्या अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. संत तुकारामांसारख्या महान संताला किती आणि काय सोसावे लागले, हे आपण जाणतो. ज्ञानेश्वरांसारख्या संताला भूसमाधी घ्यावी लागली, तर काही संतांना जलसमाधी घेण्यास या समाजाने भाग पाडले. अभिव्यक्तीवर होणारे हल्ले आजचे नाहीत. मात्र, याबाबत आपण आता गंभीरपणे विचार करायला हवा. कारण कलाच समाजाला सुसंस्कृत बनवेल. कलेचेही ध्येय हेच असायला हवे. हा ध्यास घेऊन कलेच्या आकलनाचा प्रयत्न करणारे कलावंत, अभ्यासक, कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आपल्याला हवे आहेत. कलेला समाजाशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याशिवाय कलेला आपले ध्येय गाठता येणार नाही.






कलासक्त समाजाची जबाबदारी

मराठी नाटकांचा जन्म झाला १८८३ मध्ये. या नाटकांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलं. काही नाटकांनी स्वतंत्र अस्तित्व जपत असतानाच चित्रपटांचं अनुकरण केलं. कोणत्याही कलेवर समकालीन घटनांचा- अन्य माध्यमांचा प्रभाव असतोच. तसा नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, चित्रकला या सर्व कलांवरही समाजातील समकालीन घडामोडींचा प्रभाव पडला आहे, असे आपल्या लक्षात येते.

कलेची प्रगती सुरुवातीला वेगाने व चौफेर दिशेने होत असते, पण हा वेग आणि वैविध्य कायम राहत नाही. त्याला अनेक कारणे सांगता येतील. चित्रपटनिर्मितीला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सामग्री लागते. किंबहुना तांत्रिक प्रगतीवर चित्रपटांचा दर्जा अवलंबून असतो. शिवाय अनेक प्रकारच्या कलाकारांचा तो समूह असल्यामुळे सर्वांकडून उच्च प्रतिभेचे काम होईलच, असे नाही. याच्या उलट नाटकाचं आहे. नाटक एखाद्या खोलीत बसून लिहिता येते. मोजक्या लोकांचा समूह नाटकाला पूर्णत्व देऊ शकतो. असेच संगीत कलेचे आहे. गायक आपले गायन कोणत्याही ठिकाणी करू शकतो. स्वत:ची उच्च प्रतिभा कायम ठेवून गायन करण्यात फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळेच संगीत या कलेची विशेष प्रगती झाली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळाच दर्जा आहे. कुमार गंधर्वांसारख्या कलाकाराने भारतीय संगीताला फार मोठे योगदान दिले. त्यामुळे कुमार गंधर्वकालीन संगीत आणि कुमार गंधर्व यांच्यानंतरचे संगीत असे दोन फरक किंवा सीमारेषा भारतीय संगीताच्या संदर्भात करता येतील. भारतीय चित्रपट क्षेत्राचा विकास लक्षणीय आहे, पण कुमार गंधर्वांनी जसा संगीत क्षेत्राला मोठा दणका दिला, तसा दणका चित्रपट क्षेत्रात कोणी देऊ शकले नाही. तरीही सत्यजित रे यांचे योगदान कोणत्याही अंगाने कमी नाही, पण संगीत कलेची जशी प्रगती झाली, तशी प्रगती चित्रपट, चित्रकला, साहित्याची झाली नाही, हे मान्य करायलाच हवे.
कलेची प्रगती ही एकटी असत नाही. त्यासाठी समाजाला स्थिरता मिळायला हवी. स्वातंत्र्यानंतर आपला समाज स्थिरस्थावर झाला, तरीही हा काळ पुरेसा नाही. कलेच्या विकासाला समाजाची आर्थिक, सामाजिक, वैचारिक प्रगतीही कारणीभूत असते. मुळात आर्थिक प्रगती ही कलेच्या विकासासाठीची पूर्वअट आहे. पाश्चात्य कलाकारांचे यश तुम्हाला दिसते, पण त्यांच्यामागील आर्थिक पाठबळ दिसत नाही. पं. भीमसेन जोशींना सुरुवातीला बर्‍याच हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. एवढ्या हालअपेष्टा सोसून गायन चालू ठेवणे हे खरेच अवघड काम आहे.
आणखी एक! साहित्याने काहीतरी संदेश दिला पाहिजे, असे काहींचे म्हणणे असते. हे चुकीचे आहे. संदेश देणे, समाज सुधारणा करणे हे साहित्य, नाटक, कादंबरी यांचे काम नाही. माणसाला, समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील, विचारप्रवण बनविणे हे कलेचे काम आहे आणि कलेने ते केले पाहिजे. कलेचा विकास जसा समाजावर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे गुणप्रवर्तक कलाकारांची संख्या समाजात किती आहे, यावर त्या समाजाची पात्रता अवलंबून आहे. किंबहुना, हेच समाजाचे वैभव असते. हे वैभव जपण्याचे काम कलासक्त समाजाने करावे, असे मला वाटते.

('कलात्म'च्या दोन भागांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेली प्रस्तावना)

No comments:

Post a Comment