Thursday, 24 February 2011

'उन्हाच्या कटाविरुद्ध' ...


-------------------------------------------------------------



माइंड & मीडियाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या कवी नागराज मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध' या मुलुखावेगळ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुण्यात झाले. याप्रसंगी डावीकडून डॉ. प्रदीप आवटे, प्रा. राजेंद्र दास, डॉ. कोत्तापल्ले आणि  कवी मंजुळे.
-----------------------------------------------------------------


दुःखाचे भांडवल न करता आयुष्याला
भिडणारी आश्वासक कविता
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन
पुणे : नागराज मंजुळे यांच्या कवितेत दुःख आहे. मात्र, त्या दुःखाचे भांडवल करणारी ही
कविता नाही. ती त्यापेक्षा वेगळे काही सांगू पाहते. म्हणूनच या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने मराठी साहित्यात नवी
आश्वासक कविता अवतरली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे केले.
‘माइंड & मीडिया'च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नागराज मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध' या
काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. या प्रसंगी कवी डॉ. प्रदीप आवटे, समीक्षक प्रा. राजेंद्र दास
आणि कवी नागराज मंजुळे उपस्थित होते.
जगण्याला भिडणारी ही कविता आहे, असे सांगून डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ही कविता प्रातिनिधिक आहे. ती एका समूहाची कविता आहे. ज्या वातावरणात कवीची घडण झाली, त्यातून ती निर्माण झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या कवितेवर कवीची नाममुद्रा आहे. त्याची स्वतःची अशी शब्दकळा आहे. स्वतंत्र अभिव्यक्ती आणि भाषा
आहे. त्यामुळे भविष्यात या कवितेकडून खूप अपेक्षा आहेत.
डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, या कवितेला कोणतेही लेबल लावता येणार नाही. आयुष्याच्या तळाशी जाऊन नवे काही पृष्ठभागावर आणणारी ही कविता आहे. असा कवी छंद म्हणून आयुष्यावर काही बोलत नाही. कविता ही त्याची
अपरिहार्यता आहे. नागराजसारख्या तरुणाला कविता कशी भेटते, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, अशा प्रकारचे आयुष्य जगत असलेल्या माणसालाच ही कविता दिसू शकते. कारण कविता आणि जगणे यामध्ये अद्वैत आहे. प्रा. दास म्हणाले, एका अवलिया तरुणाची ही अभिव्यक्ती आहे.
सर्वजण आनंदी झाले पाहिजेत, या माझ्या हट्टातून मी माणसांकडे आणि जगण्याकडे पाहात गेलो आणि त्या अनुभवांना शब्दरुप मिळाले, असे सांगत कवी मंजुळे म्हणाले, सगळ्याच गोष्टींना दोन बाजू असतात. त्या दोन्ही दिसत असल्यामुळे मी थोडासा अकार्यक्षम आणि अस्वस्थ होत गेलो. काहीतरी शोधण्याच्या नादात कवितेत रमलो. मग,
कविता एवढी सोबतीला आली की जगण्याचा अविभाज्य भाग झाली. आक्रोश करावा, असे कधी वाटले नाही. पण अस्वस्थता लपवावी, असेही वाटले नाही.
याप्रसंगी नागराज मंजुळे यांच्या काही कविताही सादर झाल्या. या कवितेतील वेगळेपणाने, व्यवच्छेदक शब्दकळेमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रा. मिथुनचंद्र चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. संजय चौधरी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment